“माजी आमदार नरेंद्र पवार यांनी घेतली कल्याण डोंबिवलीच्या नवीन आयुक्तांची भेट

कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांबाबत तात्काळ बैठक आयोजित करण्याची केली मागणी"

- Advertisement -

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा भाऊसाहेब दांगडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी त्यांची भेट घेत कल्याण डोंबिवली शहरातील विविध समस्या व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांबाबत निवेदन देत, कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांची संख्या पाहता नवनियुक्त आयुक्तांनी लवकरात लवकर बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी माजी नरेंद्र पवार यांनी यावेळी केली.

मागील अनेक महिन्यांपासून शहरातील वाढत चाललेली कचऱ्याची समस्या, नालेसफाई मध्ये झालेला भ्रष्टाचार, रस्त्यांची दुरावस्था, अपुरा व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, रुग्णालयांची व शाळांची दुरावस्था, वाहनतळाबाबत नसलेले नियोजन, शहर सुधारणा व सुशोभीकरण बाबत प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष, गौरीपाडा तलावाजवळील डीपी रस्ता, गावदेवी चौक, पारनाका परिसरातील अर्धवट ड्रेनेज, आधारवाडी, पारनाका, शिवाजी चौक, खडकपाडा यांसारख्या प्रमुख चौकातील वाहतूक सिग्नल मध्ये असलेल्या त्रुटी, या व अशा अनेक समस्यांचा निवेदनात उल्लेख केला असून मी स्वतः व भारतीय जनता पार्टीच्या वतीने या समस्या सुटे पर्यंत लोकशाही मार्गाने मनपा प्रशासनाचा पाठपुरावा करणार असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यावेळी म्हणाले.

यावेळी उपमहापौर बुधाराम सरनोबत,भारतीय जनता पार्टी, कल्याण शहर मंडळ अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, महिला मोर्चा अध्यक्षा ज्योतीताई भोईर, माजी मोहोने टिटवाळा मंडळ सरचिटणीस संतोष शिंघोळे, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्याम मिरकुटे, सदा कोकणे, समृध्दी देशपांडे, मोहन कोणकर आदी उपस्थित होते.