डोंबिवली शिवसेना शाखेतील शिंदे पिता पुत्रांचे फोटो काढले

 शिवसैनिक व शिंदे समर्थक आले आमने - सामने

- Advertisement -

डोंबिवली ( शंकर जाधव )  शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४०  आमदार सोबत घेवून बंड पुकारले असून याला आता आठवडा होत आला आहे . शिवसेना नेतृत्वाने या बंडखोर आमदारांविरोधात कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असल्याचे चित्र आहे .मात्र एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरातील शिवसेनेत काळापर्यंत कमालीची शांतता दिसत होती . मात्र सोमवारी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत डोंबिवली शहर शिवसेना शाखेतील एकनाथ शिंदे व खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो काढल्याने वातावरण अचानक तापले .शहर शाखेत शिवसैनिक व शिंदे समर्थक आमने सामने आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती .
एकनाथ शिंदे यांनी २० जून रोजी तब्बल ४०  आमदार सोबत घेवून बंड केल्याने ते शिवसेनेच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठे असे बंड ठरले आहे .तरीही ठाणे जिल्ह्यातील सर्वसामान्य शिवसैनिक आठवडाभर शांत होता .त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते .त्यातच या बंडखोर गटाने अजूनही आपण शिवसेना सोडली नसल्याची व शिवसेनेतच असल्याची भूमिका कायम ठेवली आहे .तसेच आजही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द वापरले नाहीत .दुसरीकडे शिवसेनेने एकनाथ शिंदे यांचे गटनेते पद काढले असले तरी त्यांचे शिवसेना नेतेपद काढून घेतले नाही .त्यामुळे आजही  सामान्य शिवसैनिक संभ्रमात पडला असल्याचे चित्र आहे .
 एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे .त्यामुळे मुंबईसह राज्यभरात अनेक ठीकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत .शिवसैनिक रस्त्यावर उतरून बंडखोरांच्या विरोधात आंदोलन करीत असल्याचे चित्र आहे . एरव्ही कोणतेही आंदोलन असू दे ,डोंबिवलीची शिवसेना नेहमीच पुढे राहिली आहे .मात्र शिंदे यांच्या बंडानंतर डोंबिवली शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता व कमालीची शांतता दिसत होती . डोंबिवलीच्या शिवसेनेत ओरीजनल शिवसेनेचे शिवसैनिक व एकनाथ शिंदे समर्थक असे अप्रत्यक्षपणे उभे दोन गट पडले आहेत . उगाच आपसात वाद करण्यापेक्षा वेट एन्ड वॉच अशीच सामंजस्याची भूमिका या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी काल पर्यंत घेतली होती .त्यामुळे डोंबिवली शिवसेनेत शांतता असल्याचे चित्र होते .मात्र हि शांतता वादळापुर्वीची असल्याने पोलिसांनी डोंबिवली शहर शाखेबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने शाखेला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते .

 

डोंबिवली शिवसेना शाखेतच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय आहे .सोमवारी सकाळी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आक्रमक झाल्या .त्यांनी शाखेत लावण्यात आलेले एकनाथ शिंदे व खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो काढून बाजूला ठेवले .याची खबर मिळताच शिंदे समर्थक शिवसेना शाखेत पोहोचले व त्यांनी जाब विचारला .त्यावरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तू तू – मै मै झाली . एकमेकांना शिवीगाळ व धक्काबुक्की देखील झाल्याने तणावाची परिस्थिती झाली .अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केला .त्यावेळी शिंदे समर्थकांना शाखेतून बाहेर काढा ,असा तगादा शिवसैनिकांनी लावल्याने पोलिसांनी त्यांना बाहेर काढले .त्यानंतर वातावरण शांत झाले .
शिंदे समर्थकांना शाखेत येऊ देणार नाही..
महिला शिवसैनिकांचा शाखेबाहेर पहारा
शिंदे समर्थक व शिवसैनिकांमध्ये  शिवसेना मध्यवर्ती शाखेबाहेर वाद झाल्याने काही वेळ वातावरण तापले होते.शिंदे समर्थक राजेश कदम यांनी शिवसैनिकांना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या डोंबिवली येथील निवासस्थानी येण्याची विंनरी केली.मात्र शिवसैनिकांनी यावर कडाडून विरोध करत आम्ही कालच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेण्यास गेलो होतो, आता आम्हाला खासदार डॉ.शिंदे यांच्या निवासस्थानी जाण्याची आवश्यकता नाही अशी ठाम भूमिका घेतली.तर शिवसैनिक महिला आक्रमक झाल्याचे पाहताच कदम निघून गेले.शिवसेना शाखेत शिंदे समर्थकां ना येऊ देणार नाही अशी भूमिका घेत शिवसैनिक महिलांनी शाखेच्या बाहेर पहारा केला.