ठाणे जिल्हा महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदी राणी बैसाणे तर सदस्यपदी अँड.मनिषा झेंडे विराजमान

उल्हासनगर शहराला मिळाला दुहेरी बहुमान

- Advertisement -

उल्हासनगर शहराला मिळाला दुहेरी बहुमान;ठाणे जिल्हा महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदी राणी बैसाणे तर सदस्यपदी अँड.मनिषा झेंडे विराजमान 

उल्हासनगर : दुर्लक्षित बालकांची काळजी आणि संरक्षणासाठी ठाणे जिल्ह्यात बाल कल्याण समिती (सीडब्ल्यूसी) कार्यरत आहे.बाल कल्याण समितीवर एक अध्यक्ष आणि चार सदस्यांची नियुक्ती सरकारकडून केली जाते. या समितीमध्ये महिला सदस्य असणे आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यातील समितीच्या बैठकाही होत असतात. विशिष्ट निकष पूर्ण करणाऱ्यांची समितीवर निवड केली जाते. बालकामगार तसेच अनाथ किंवा वाट चुकलेली मुले किंवा आई-वडील मारहाण करत असल्यास मुलांना पालकांसोबत राहायचे नसते किंवा जन्मत:च मुलांना बेवारस स्थितीत सोडून दिले जाते.अशा शून्य ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना बालकल्याण समितीपुढे हजर केले जाते.समितीने दिलेल्या आदेशानंतर मुलांची रवानगी शिशूगृह किंवा बालगृहात केली जाते. तसेच, या अल्पवयीन मुला-मुलींच्या पालकांचा शोध घेण्याबाबतही ही समिती संबंधित यंत्रणांना आदेश देते. मुलांच्या दत्तक प्रक्रियेच्या कामातही ही समिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.त्यामुळे बालकांची काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीने बाल कल्याण समिती खूपच महत्त्वपूर्ण आहे.

ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या बाल कल्याण समिती (सीडब्ल्यूसी) चा कार्यकाळ संपत आला असताना रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.त्यानुसार पात्र उमेदवारांच्या झालेल्या निवडीत राज्यपाल यांच्या आदेशाने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार उल्हासनगर शहरातील राणी बैसाणे यांची ठाणे जिल्हा महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष पदाकरिता आणि अँड.मनिषा झेंडे यांची सदस्य पदावर निवड करण्यात आली असून उल्हासनगर शहराला हा दुहेरी बहुमान मिळाल्याबद्दल शहरातून राणी बैसाणे व अँड. मनिषा झेंडे यांच्या वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.ठाणे जिल्हा महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष पदावर निवड झालेल्या राणी बैसाणे यांना २० वर्षाच्या सामाजिक कार्याचा प्रदिर्घ अनुभव असून त्यांनी निर्मला निकेतन काँलेज मध्ये ( BSW ) व टाटा इन्स्टिट्यूट मधून ( MSW ) समाज कार्य क्षेत्रात पदवी घेतली असून जवळपास १५ वर्ष विविध नावाजलेल्या संस्था,संघटनांमध्ये महिला व बाल विकास याबद्दल त्यांनी केलेले कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.

 

तसेच सदस्य पदावर निवड झालेल्या अँड.मनिषा झेंडे यांनी वकीलीची पदवी घेतली असून त्याचबरोबर MSW ची सुध्दा पदवी घेतली आहे.आपल्या श्रमिक महिला मंडळाच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात सक्रिय असून आजपर्यंत त्यांनी कष्टकरी व दुर्लक्षित महिलांसाठी विविध लोकोपयोगी उपक्रम आणि शासकीय योजना राबविल्या आहेत.नवनियुक्ती झालेल्या राणी बैसाणे व अँड.मनिषा झेंडे हे उल्हासनगर शहरातील कँम्प नंबर ४ चे रहिवासी असून याच भागात राहणाऱ्या सुनिता बाभुळकर इंगळे या देखील नुकताच कार्यकाळ संपलेल्या ठाणे जिल्हा महिला बाल कल्याण समितीच्या माजी सदस्य असून त्याच्या कार्यकाळात समितीने उल्लेखनीय कार्य केले आहे.सुनिता बाभुळकर इंगळे यांच्याकडे समितीच्या कामाचा प्रदिर्घ अनुभव असून त्यांनी समितीचे कामकाज उत्तम प्रकारे हाताळले असल्याने त्याचा उपयोग राणी बैसाणे व अँड.मनिषा झेंडे यांना होऊन ते ठाणे जिल्हा महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून पिडीत महिला व दुर्लक्षित बालकांना न्याय देत उल्हासनगर शहराचा नावलौकीक वाढवतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.