माझं जेवण चुलीतच – ग्रामीण कथा

- Advertisement -

एका खेडेगावात एक कुटुंब राहात होतं .ते दोघे अशिक्षित अडाणी होते. त्या शेतकऱ्याचं नाव सदुभाऊ असे होते. आणि त्याच्या बायकोचं नाव रखमा असं होतं. सदुभाऊ लहानपणापासून अनाथ व पोरका झाला होता. त्याचे आई-वडील लहानपणीच वारले. त्यामुळे तो लोकांची कामं मिळेल ते करत होता .असे करता करता तो मोठा झाला. त्याचं लग्नाचं वय झालं. सगळे म्हणू लागले ,सदू आता लगीन कर. मग सदू म्हणायचा, लगीन कसं करणार? माझ्याजवळ पैका आहे कुठं? मी लगीन कशाच्या जोरावर करू? तेव्हा गावकऱ्यांनी पंचायत बोलावली. आणि सरपंचाच्या कानावर ,सदु भाऊचा लग्नाचा प्रश्न टाकला. सदूभाऊ म्हणाला, नगं नगं   माझ्या कडून तुमचं पैक मला द्याया जमणार नाही .तसे सरपंच म्हणाले, सदू तू काळजी करू नकोस. आम्ही  सगळे मिळून तुझ्या लग्नाचा खर्च सांभाळून घेऊ .तुला पैसे देण्याची ची गरज नाही . हो ना हो ना करता करता एकदा लगीन करायचं ठरलं. खेड्यातली पाटलाची पोर पसंत केली .पाटलाला चार लेकी होत्या. सर्व लग्नाच्या झाल्या .पण पाटील गरीब असल्यामुळे त्या मुलींची लग्न  होत नव्हती. सरपंच स्वतः जाऊन पाटलाला सांगू लागले , पाटील काळजी करू नका. आमचा सदुभाऊ लई गुणी पोरगा आहे .तुम्ही डोळे झाकून पोरगी द्या. पाटील म्हणाले, अहो पण माझ्याकडे पैकं  नाही .सरपंच म्हणाले, आहो तुमची मुलगी आम्ही बिना हुन्ड्याने करून घेतो .तेव्हा कुठे पाटील तयार झाला .लग्न साध्या पद्धतीने लावून  ,सदुभाऊव रखमा घरी आले.घरी आल्यावर शेजारी बायकांनी तिला  उंबरा ओलांडताना माप ओलांडायला सांगितलं. तेव्हापासून रखमा आणि सदुभाऊ गुण्यागोविंदानं नान्दू लागले. सदुभाऊ लोकांच्या शेतात जाऊन मजुरीने काम करीत असे.रखमा जरा आळशीच होती. ती फक्त घरातला काम धंदा बघायची .गाई गुरांचा चारा पाणी  करायची .सदुभाऊ सकाळी लवकर उठून शेतावर जायचा.  आणि रखमा घरातलं काम आवरून स्वयंपाक पाणी करून ठेवायची. सदू दुपारी शेतातून जेवायला घरी यायचा. रखमा त्याला ताटपाट मांडून जेवायला वाढायची. जेवताना त्याच्या जवळच बसायची. सदुभाऊ तिला म्हणायचा ,रखमा तू पण बस की गं माझ्याबरोबर जेवायला. रखमा म्हणायची नगं नगं  तुम्ही सकाळपासून लोकांच्या शेतावर राब राब राबता किती काम करता, तुम्ही जेव्हा सुखानं .तू कधी जेवशील असे सदुभाऊ तिला विचारायचा.  ती म्हणायची माझं काय मेलीचं,माझं जेवण चुलीतच. असं काय म्हणतेस, असं नको करू गं, तू पण घरात काम करतीस, तुला जेवायला नको का?ती  म्हणायची तुम्ही गेल्यावर जेवीन  दमानं. सदुभाऊ म्हणायचा मी जरा आराम करतो .पण ती म्हणायची नगं नगं लोकांच्या शेतात तूम्ही नीट काम  करावं ,नाहीतर शेत वाला आपल्याला कामावरून काढून टाकेल. मग आपण  काय खाणार? असं म्हणून त्याला लवकरच पिटाळून लावायची.असं करता करता बरेच दिवस गेले. सदुभाऊ तिला रोज जेवायला बोलवायचा, पण तो गेल्याशिवाय ती  जेवत नसे. लग्न झाल्यापासून एकदाही सदुभाऊ बरोबर ती जेवत नसे .त्यामुळे सदुभाऊ ला वाईट वाटले. तो रोज रोज सांगून कंटाळला. त्याच्या लक्षात येऊ लागलं, जेवणाला नकार का देते? कधीकधी तर ती म्हणायची, माझा आज उपवास  आहे .सदुभाऊ म्हणायचा नको अशी उपास करू इतके. तेव्हा ती म्हणायची, आहो मी देवाला नवस बोलली आहे. देवा तुझे उपवास करीन पण माझ्या नवऱ्याला एवढी कष्टाची काम देऊ नको .आमची परिस्थिती चांगली होऊ दे .असं तिने नव-याला सांगितलं. मग काय बोलणार विचारा .तो बिचारा शेतावर निघून जायचा. आणि इकडे बायको मात्र सगळं आटपून, जेवायला बसायची. काही दिवसांनी सदु भाऊच्या लक्षात येऊ लागलं . आपलं लग्न झाल्यापासून ही इतके उपास करते तरीपण बारीक कशी नाही झाली ?कारण माहेरून येताना एकदम लुकडी सुकडी  होती . आता मात्र दिवसेदिवस गुबगुबीत  होऊ लागली. मग मात्र त्याने एक दिवस मनाचा पक्का विचार केला.  आणि तो त्यादिवशी बायकोला म्हणाला, रखमा माझ्या पोटात लय दुखतंय, मी आज घरीच आराम करतो. तशी रखमा म्हणाली ,तुम्ही घरी राहून कसं चालेल ?तुम्हाला मी गरम पाणी आणि ओवा देते.  मग तुम्हाला बरं वाटेल .म्हणून तो तयार झाला पण त्याच्या मनात वेगवेगळ्या शंका येऊ लागल्या. म्हणून आपल्या घराच्या धाब्यावर जाऊन बसला. गावाकडची घरे धाब्याची असतात. वर गेल्यावर त्याने धाब्याच्या सान्यातून ,  बघत होता.  चुलीच्या वरच्या बाजूला (एक छोटीशी मोकळी जागा असते तिला साने असे म्हणतात).मग  बघतो तो तर  काय , रखाने परातीत रवा, मैदा साखर,तूप,आणिकाजू बदाम  तिने ते सगळे एकत्र केले  आणि त्याचा रोडगा बनविला. आणि गरम गरम चुलीत रोडगा  ठेवला. वरून राखुंडी आणि निखारे ठेवले. हे सर्व सदुभाऊ वरून बघत होता. रोडगा तयार झाल्यावर तिने उलथण्याने बाहेर काढला. कपड्याने पुसून घेतला  आणि त्याचा  बारीक बारीक चुरा केला. त्याच्यात दूध टाकले. आणि मिटक्या मारत ती खाऊ लागली. ती खात असतानाच सदुभाऊ घरात आला आणि तिला म्हणाला, असं हे व्हयं तुझ्या उपासाचं रहस्य! म्हणूनच तू माझ्याबरोबर जेवत नव्हती. आता कळलं तुझं हे रहस्य.तुझं सगळं पितळ बाहेर पडलं की गं. रोज रोज मला सांगायची की, माझं मेलीचं जेवण चुलीतच हे आता  समजलं.  इतकी लबाड असशील तू हे  माझ्या भोळ्याभाबड्या मनाला कधी शिवलचं नाही गं. अशी ही रखमाच्या  जेवणाची रहस्यकथा उघडकीस आली. धन्यवाद!

 (सौ. सुहासीनी सुधाकर भालेराव, ठाणे)9823387888