निळा कोल्हा…बोध कथा

- Advertisement -

ऐका मुलांनो आज तुम्हाला एक जम्माडी जंमत गोष्ट सांगत आहे .

एकदा जंगलातून एक तहानलेला  कोल्हा पाण्याच्या शोधार्थ एका गावामध्ये येतो तरीपण त्याला कोठे पाणी मिळत नाही त्यानंतर तो एका टाकीमध्ये डोकावून बघतो आणि तोल जाऊन आत पडतो ती टाकी शाईची असते. कोल्हा बाहेर येतो तो निळा होऊनच येतो. तशीच जंगलाकडे धूम ठोकतो तिथे एका डबक्यात त्याला साठलेले पाणी दिसते त्या पाण्यात डोकावले तर त्याला पाण्यामध्ये कधी न पाहिलेला एक निळा रंगाचा विचित्र प्राणी दिसतो त्याने पंजा उगारला की पाण्यातील प्राणी पंजा  उगारतो. तो ओरडला की आतील प्राणी पण ओरडू लागतो. मग त्याला कळते की ते आपलेच प्रतिबिंब आहे पण आता जंगलामध्ये कसे जायचे बाकीच्या प्राण्यांमध्ये कसे मिसळायचे त्यांना काय सांगायचे आपली फजिती सांगितली तर सगळेजण चेष्टा करतील त्यापेक्षा आपण असं करूया काहीतरी युक्ती काढूया असा विचार करून बोलला कोल्हा मोठ्या डौलाने छाती पुढे काढून जंगलात शिरतो आणि सर्वांना ओरडून सांगू लागतो मी देवाने धाडलेला देवदूत आहे .या जंगलाच्या भविष्यासाठी मनुष्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी मला परमेश्वराने पाठवले आहे आणि देवाने सांगितले इथून पुढे जसे मी सांगेन तसे तुम्ही सर्वजण वागाल त्याबरोबर सगळे प्राणी पळत-पळत जंगलचा राजा सिंहाकडे जातात आणि त्याला नवीन अजब निळ्या रंगाच्या प्राण्याची माहिती सांगतात. जंगलचा राजा सिंह व त्याला बोलावून घेतो त्याचे आगत-स्वागत करतो आपल्या दरबारात त्याला मानाचे स्थान देतो आणि त्याच्या सल्ल्याने वागू लागतो.

त्यामुळे कोल्ह्याला खूपच गर्व होतो तो स्वतःलाच आता जंगलचा राजा समजू लागलेला असतो त्याने प्रजेने आम्हाला राजाला आणि देवदूताला रोज जेवण आणून द्यावे असा फतवा काढला त्यानंतर दररोज निराळ्या गोष्टी नियम तो जंगलात आणू लागला मनुष्य वस्ती मध्ये राहून आल्याने तेथील नियम तो जंगलात आणू लागला.राजा आणि देवदूत कोठे चालले असता सर्वांनी रस्त्याच्या एका कडेला उभे राहायचे आम्हाला सलाम  करायचा. रोज कोल्ह्याला गोड गोड फळे आणि सिंहाला एका प्राण्याचं  मांस शिकार करून आणून द्यायचं किंवा एका जिवंत प्राण्याने स्वतःहून गुहेत यायचं जंगलचा राजा तर आता  खुश झाला देवदूत त्याच्या गळ्यातील ताईत बनला. पण इतर प्राणी मात्र नाराज झाले. दिवसेंदिवस जंगल कमी होत असल्याने इथे स्वतःचे पोट भरणे मुश्कील असताना यांना ऐते कोण देणार. शिवाय प्रधान वाघोबा चे महत्व कमी झाले. त्याला उलट शिकार करून सिंहाला आणून देण्याचे काम लागले. सर्वच प्राणी मनात चरफडू लागले .

एकदाचा उन्हाळा संपून पावसाळा आला. सर्वच प्राणी खुश झाले कारण, त्यांची आता पाण्याची टंचाई कमी होणार होती. अचानक मेघांच्या धारा बरसू लागल्या पण सर्व प्राणी बाहेर येऊन पावसात भिजण्याचा आनंद घेत होते .मोराने आपला पिसारा पसरून थुई -थुई   नाचायला सुरुवात केली. पक्षी आपल्या पंखांवर जलधारांचे थेंब झेलू लागले . सगळ्या प्राण्यांचे पाहून, देवदूताचा देखील जीव राहीना. तो देखील पावसात भिजू लागला आणि तोंडाने कोल्हेकुई करू लागला. सगळ्या गोंधळात आधी कोणाचे लक्ष त्याच्याकडे गेले नाही. पण पावसामुळे अंगावरची सगळी नीळ  धुवून गेली. निळ्या रंगाचे थळे त्याच्याभोवती साचले आणि अचानक सर्व प्राण्यांचे लक्ष निळ्या कोल्ह्याकडे गेले  .

अरे !हा कोणी देवदूत नाही. हा तर आपल्यातीलच एक कोल्हा आहे .त्याने आपल्याला फसवले, याला धरा! पकडा! मारा!. आपण काय करून बसलो आहे त्या कोल्ह्याच्या लक्षात आले .पण आता काही पर्याय नव्हता तो आपली सफाई देण्याचा प्रयत्न करत होता ,की “मी सांगतो खरे काय झाले ते !मी सर्वांची गंमत केली ,वगैरे वगैरे पण कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सर्वांना त्याचा राग आला होता .जास्त करून वाघोबा प्रधानाला त्याचा राग आला होता .सिंह महाराज काही बोलण्याच्या आतच, वाघोबाने झडप घालून त्याला  गट्टम केले.

(पारंपारिक कथेवर आधारित)

 

मुलांनो या गोष्टीचे तात्पर्य काय कधी खोटं बोलू नये कोणाला फसवू नये नाहीतर शेवटी त्याचे परिणाम भोगावे लागतात.

 

                                                               सौ ज्योती गोसावी /दुसंगे

                                                             उपाध्यक्ष नील पुष्प साहित्य मंडळ ठाणे