मुंजाबा डोंगर….. एक अविस्मरणीय आठवण

- Advertisement -

डॉ. नारायण तांबे
अध्यक्ष- नीलपुष्प साहित्य मंडळ, ठाणे जिल्हा.

युष्याच्या या वाटेवरती खूप प्रवास केला.देवस्थानं,धार्मिकस्थळं,प्रेक्षनीयस्थळं, प्रदेश प्रवास झाला पण ५०/५५वर्षांपूर्वीचा प्रवास तो अनुभव फारच उत्साही, बेभान,मुक्त असा होता. मुंजाबाचा डोंगर!मुंजाबा डोंगर सौंदर्याची खाण आहे,ठेवा आहे. लहानपणापासून आकर्षण आहे फिरण्याचे, नवनवीन ठिकाणे पाहण्याचे, मग ते गडकिल्ले असो, डोंगर असो नाहीतर शहर, नाहीतर एखादं खेडं असो.

मुंजाबाच्या डोंगरावर एक छोटीसी गुहा आहे… कपार म्हणा ना! तिथं उभं राहून अख्ख्या पंचक्रोशीचा नजारा, सृष्टीसौंदर्य पाहणं हा एक आगळा वेगळा अनुभव असतो. ऑगष्ट महिन्यातील सर्व शिवार हिरवेगार…तीन चार मैलाचा पायी प्रवास…कधी गाडी रस्ता तर कधी शेतातून पायवाट, नागमोडी वळणे,मध्येच ओढ्या-नाल्यांचा खळखळ वाहणारा प्रवाह ओलांडून आम्ही मित्र पुढे जात होतो.वाटेच्या दोन्ही बाजूला शेतातील कधी भुईमूगाला आलेली पिवळी,लाल फुल तर वाऱ्या बरोबर डुलणारी भरात आलेलं बाजरीचं पिकं.शेतात काम करणाऱ्या स्रीया, पुरुष! दूरवर दिसणारा मुंजाबा डोंगर, त्यावरचा मुंजाबा देव! त्या डोंगराचं शिखर आम्हाला लवकरात लवकर या असे खुणावत होते. जाताना वाटेत मुंजाबा डोंगराच्या पल्याड राहणारा एक ठाकर आम्हाला भेटला. अंगात बंडी, कमरेला खोचलेलं अर्ध धोतर, अनवाणी. आम्ही त्याचे नाव विचारलं. त्यानं हसत-हसत म्या गणू ठाकर म्हणून सांगितले. चालताना गप्पा सुरू झाल्या. गावातून तो बाजारहाट करून आपल्या घराकडं निघाला होता. चालता-चालता खिशातून एक खाकी रंगाचा बटवा काढला. बटव्यात हात घालून दोन गारगोट्या काढल्या आणि थोडासा कापूस गारगोटीवर ठेवला आणि एकमेकांवर घासून ठिणगी पाडून (चकमक) गणूने विडी पेटवली. तो त्या विडीचा झुरका मारत होता. विडी ओढणारा गणू ठाकर स्वतःत मग्न होऊन झुरक्याचा आनंद घेत होता आणि अंगात शिरलेली थंडी चालवत होता. वारा अंगावर झेलत लगबगीने मुंजाबा डोंगराच्या पलीकडे घराकडे जाण्यासाठी आमच्याबरोबर चालत होता. अनवाणी पायाने चालत असूनही त्याचा तो आनंद माझ्या नजरेतून सुटला नाही. आनंदी जगणे म्हणजे काय ते त्या गणू ठाकरात दिसले.

सूर्योदय ते सुर्यास्त असे या आदिवासी जमातीचे जीवन आहे, हे त्याच्याकडून समजले. ही लोकं निसर्गाशी एकरूप होऊन जीवन जगतात. त्याच्याकडे लहान मुलासारखी निरागसता, सत्य आणि प्रामाणिकपणा दिसून आला.उपजिविकेची साधने मात्र नाहीत, शिक्षण नाही. आर्थिकदृष्ट्या त्याची परिस्थिती फार खालावलेली जाणवली. पण त्याचे त्याने भांडवल केलं नाही. आहे त्या परिस्थितीत तो जीवनाचा आनंद घेत आहे. एकूणच काटक शरीरयष्टी असलेल्या एका आदिवासी माणसाच्या जीवनातील कष्ट, बोलण्यातील गोडवा, त्याचं समाधान आणि त्याची समज कळून आली होती. आम्ही आता मोठ्या साहसाने डोंगरावर चढत होतो. मोठी झाडे नव्हती, पण छोटी-छोटी झुडपं होती. हिरवळीचा गालीचाच होता. डोंगराच्या मध्यभागावर आम्ही थोड्यावेळासाठी थांबलो. गणू ठाकरानं आम्हाला विचारलं, “म्या पुढं निघू?” आम्ही आनंदाने हो म्हणालो. तो आमचा निरोप घेऊन पुढे त्याच्या घराकडे झपाझप पावलं टाकत निघाला आणि काही क्षणातच तो दूरवर गेलासुद्धा म्हणजे एक-दीड तास तो आमच्या चालीनुसार रमतगमत चालला होता.

सभोवती दिसणारा नजारा बघून नेत्रसुख म्हणजे काय असतं, याचा प्रत्यय आला. अप्रतिम निसर्गसौंदर्य होते ते! आम्ही बसलो होतो त्याच्या बाजूलाच डोंगराच्या पोटात एक कपार होती. कपारीतून थंड पाणी झुळूझुळू वाहत होते. तो एक झरणाच होता. त्या कपारीतून आत गेलो. ती छोटीशी गुहाच होती. त्या झरण्याचे थंडगार पाणी घटाघटा मनसोक्त प्यायलो. गुहेच्या बाहेर आजूबाजूला मनमोहक रंगाची रानफुले डोलत होती. त्याच्यातच काही लाजाळूची झाडं होती. त्यांना स्पर्श केला की ती ती पानं मिटत होती. काय परमेश्वरी लीला! बाजूलाच एका दगडावर मी बसलो. पायानेच लहान-लहान दगड मातीतून मोकळे करून खाली ढकलत होतो. ते दगड घरंगळत उड्या मारत खाली-खाली जात आणि दिसेनासे होत. मी खिशातून रुमाल काढला. त्यात एक छोटासा दगड गुंडाळून तो खाली टाकला. तो रुमाल आणि दगड खाली जाताना दिसत असतानाच मध्येच तो दगड खाली गेला आणि रुमाल हवेने परत वर आला एवढा जोराचा वारा होता. तो रुमाल पटकन पकडला. दूरवर शेतात काम करणारी पुरूष मंडळी, स्त्रिया खेळण्यातल्या बाहुल्यांसारखे दिसत होते. एखादा माणूस कितीही अरसिक असला तरी त्याला भुरळ पडेल असे ते वातावरण होते. काही वेळातच बोलता-बोलता आम्ही डोंगराच्या वरच्या भागावर एकमेकांच्या हाताला पकडून अगदी वर टोकावर आलो. वाऱ्याचा जोर एवढा होता की नीट उभेसुद्धा राहता येत नव्हते. त्या घोंगावणाऱ्या वाऱ्याचा तो आवाज, माथ्यावर दाट धुके व ढग जमा झाले होते. थंडगार वारे अंगावर झेलत आम्ही तिथूनच सृष्टी सौंदर्य पाहत होतो.पाऊसगाणी, कविता आम्ही म्हटल्या. त्या गणूचं घर कुठं दिसतं का ते निरखून पाहताना लांबवर एक-दोन झोपड्या दिसल्या.

सकाळपासून पायी प्रवास,डोंगर चढून आल्यामुळे भूकेने व्याकुळ झालो होतो.एका मोठ्या दगडाच्या आडोशाला आम्ही बसलो.आणलेल्या दशम्यांवर आम्ही तुटून पडलो.सुंदर दशम्या,बाजरीच्या भाकरी,ठेचा,लसणाची चटणी,लोणचं जेवणाचा छान आस्वाद घेतला. नंतर पुन्हा भेंड्या,दंगा मस्ती,नाचलो,खेळ खेळलो दिवसभराचा वेळ कसा गेला ते कळलेच नाही. हवेने ओले कपडे केव्हांच सुकले होते.आणि परतीच्या प्रवासाला निघालो. उतरतानाही तोच उत्साह होता. थकवा असा जाणवलाच नाही. उलट सृष्टीचं ते मनमोहक रूप, स्वच्छंदी जगणारा तो गणू ठाकर यांनी आमच्या जीवनानुभवात भरच टाकली होती.