सुभाषनगर मधील नागरिक दुषित पाण्याने त्रस्त

जुन्या पाईपलाईनमुळे ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात

कल्याण : कुणाल म्हात्रे 

कल्याण पश्चिमेतील फडके मैदानासमोरील सुभाष नगर परिसरातील नागरिक दुषित पाण्याने त्रस्त असून येथे असलेल्या जुन्या पाईपलाईनमुळे ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात येत असल्याने हेच्च पाणी या नागरिकांना प्यावे लागत आहे. याबाबत केडीएमसीला वारंवार तक्रार करून देखील समस्या सुटत नसल्याने शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले यांच्या समवेत येथील नागरिकांनी केडीएमसी  कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांची भेट घेत समस्या सोडविण्याची मागणी केली. यांवर मोरे यांनी हि समस्या लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

सुभाष नगर परिसरात टाकण्यात आलेली पाण्याची लाईन अनेक वर्षे जुनी असून त्यावर ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे. पाण्याची पाईपलाईन जीर्ण झाल्याने यामध्ये ड्रेनेजचे पाणी झिरपते. हेच गढूळ पाणी नळाद्वारे नागरिकांच्या घरात येत असल्याने नागरिकांना हे गढूळ पाणी प्यावे लागत आहे. या गढूळ पाण्यामुळे नागरिकांना आजारांना सामोरे जावे लागत आहे.

या समस्येबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला वारंवार तक्रार करून देखील पालिका अधिकारी लक्ष देत नसल्याने नागरिकांनी याबाबत शिवसेना उपशहर प्रमुख नगरसेवक मोहन उगले यांना समस्या मांडली असता त्यांनी या नागरिकांसह पालिका मुख्यालय गाठत कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांची भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले. नागरिकांनी लवकरात लवकर आपली समस्या सोडवत नियमित शुद्ध पाणी देण्याची मागणी केली. याला मोरे यांनी सकरात्मक प्रतिसाद देत लवकरच हि समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!