पर्यावरणावर काम करणा-या संस्था व नागरिकांनी देखील केली केडीएमसीच्या जैवविविधता उद्यानाची प्रशंसा 

कल्याण : कुणाल म्हात्रे 
जैवविविधता दिनाचे औचित्य साधून महापालिकेने नुकतेच महापालिका परिक्षेत्रातील नागरिक व पर्यावरणावर काम करणा-या संस्था यांच्यासाठी आंबिवली टेकडीवर “निसर्गातील भ्रमंतीचे” आयोजन केले होते. सकाळच्या प्रहरात आयोजिलेल्या या नेचर ट्रेलला निसर्गप्रेमीनी व एनजीओनी भरभरून प्रतिसाद दिला. महापालिका सचिव तथा मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी उपस्थितांना आंबिवली टेकडीवर असलेल्या निसर्ग संपदेची माहिती दिली. तसेच या जैवविविधता उदयानात आढळणा-या पक्षी, प्राणी यांची माहिती देत निसर्गाची या वनसंपदेची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच या परिसरात खाद्य पदार्थ व प्लास्टिक वस्तु यांना याठिकाणी आणण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे ही यावेळी सांगितले.
निसर्गाच्या सानिध्यात राहून आपली जीवनशैली व्यवस्थित पार पाडता येते याचे प्रत्यंतर आज आपल्याला आले आहे. या स्वच्छ, सुंदर उदयानाप्रमाणेच आपले शहर स्वच्छ, सुंदर व चांगले होण्याकरीता आपल्या सर्वांना एकत्रितरित्या प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि मानवनिर्मित किंवा प्लॅस्टिकच्या समस्या असतील तर आपल्याला एकत्र येवून सोडवायच्या आहेत. आपण जर एकत्र आलो तर या समस्या निश्चितच सुटतील यामुळे आपले शहर स्वच्छ, सुंदर व चांगले राहायला मदत होईल असे उद्गार घनकचरा व्यवस्थापन तथा पर्यावरण विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी यावेळी काढले.
महापालिकेच्या प्रकल्पांपैकी आंबिवलीतील जैवविविधता उद्यान हा एक उत्कृष्ट प्रकल्प आहे अशा शब्दात निसर्गप्रेमी नागरीक श्रीनिवास घाणेकर यांनी महापालिकेचे कौतुक केले. यावेळी स्वच्छ भारत अभियानाचे ब्रॅन्ड ॲम्बॅसिडर डॉ.प्रशांत पाटील, रुपिंदर कौर, पर्यावरण दक्षता मंचच्या  रुपाली शाईवाले, अनिल मोकल तसेच कल्याण व डोंबिवलीतील ‍स्वच्छता दुत व एन.जी.ओ., पत्रकार, महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!